तिसऱ्या अपत्यामुळे नोकरी आली धोक्यात -कोल्हापूर जिल्हा परिषदेत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 21:34 IST2018-06-08T21:34:39+5:302018-06-08T21:34:39+5:30
जिल्हा परिषदेतील कर्मचारी महासंघाचे जिल्हा सचिव अजित मगदूम यांच्याविरोधात त्यांच्याच गावातील ग्रामस्थाने तिसºया अपत्याबाबत तक्रार केली असून, त्यामुळे मगदूम यांची नोकरी धोक्यात आली आहे.

तिसऱ्या अपत्यामुळे नोकरी आली धोक्यात -कोल्हापूर जिल्हा परिषदेत तक्रार
कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील कर्मचारी महासंघाचे जिल्हा सचिव अजित मगदूम यांच्याविरोधात त्यांच्याच गावातील ग्रामस्थाने तिसऱ्या अपत्याबाबत तक्रार केली असून, त्यामुळे मगदूम यांची नोकरी धोक्यात आली आहे.
मगदूम हे करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्याच गावचे शाहू पांडुरंग चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेकडे मगदूम यांना २00५ नंतर तिसरे अपत्य झाल्याची लेखी तक्रार केली आहे. केवळ तक्रार न करता लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र चुकीचे दिल्याबद्दल त्यांच्यावर कारवाईचीही मागणी केली आहे.
मगदूम यांना २00५ आधी दोन मुली असून त्यांना १३ नोव्हेंबर २0१२ रोजी मुलगा झाला आहे. याबाबतची इस्पुर्ली (ता. राधानगरी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कागदपत्रेही अर्जासोबत जोडण्यात आली आहेत. शासकीय नियमानुसार सरकारी सेवेत असणाºया कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यास २00५ नंतर तिसरे अपत्य झाल्यास त्याच्या नोकरीवर गंडांतर येऊ शकते.
हा अर्ज आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाने इस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामसेवक यांच्याकडे याबाबत पत्रव्यवहार केला. त्यानुसार इस्पुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मगदूम यांना अपत्य झाल्याबाबतचा कागदोपत्री पुरावा देण्यात आला आहे. याबाबत आता मगदूम यांना रीतसर नोटीस काढली जाणार असून, त्यांचेही याबाबतचे म्हणणे घेण्यात येणार आहे. त्यांचे म्हणणे घेतल्यानंतर मग पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
मगदूम हे कर्मचारी महासंघाचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. कर्मचाºयांवर अन्याय झाल्यानंतर ते नेहमी त्याचे निवारण करण्यासाठी अग्रेसर असतात. सध्या ते गगनबावडा पंचायत समितीच्या बांधकाम विभागामध्ये कनिष्ठ सहायक म्हणून सेवेत आहेत. मगदूम यांच्याबाबत ही तक्रार झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये याची चर्चा सुरू आहे.
अशा पद्धतीची तक्रार झाल्याचे मला समजले आहे. याबाबत प्रशासनाकडून काही विचारणा झाल्यास मी माझे म्हणणे त्यांना देईल; परंतु कशामुळे ही तक्रार झाली याविषयी मी अनभिज्ञ आहे.
- अजित मगदूम